शुक्रवार, २० जुलै, २०१२

धोका ऍडवेअर, स्पायवेअर आणि मॅलवेअरचा

महाराष्ट्र टाईम्स Link - http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/msid-5039462,prtpage-1.cms

ज्याला कम्प्युटर चालवता येतो त्याला व्हायरसबद्दल माहीत नसणं हे शक्यच नाही. व्हायरसचा त्रास प्रत्येकालाच कधी ना कधी झालेला असतो. त्यामुळे व्हायरसमुळे कम्प्युटरला त्रास होऊ नये म्हणून व्हायरसला काढण्यासाठी अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आपण न चुकता कम्प्युटरमध्ये लोड करून घेतो, असं असलं तरी प्रत्यक्षात सध्या व्हायरसऐवजी इतर गोष्टी कम्प्युटरला त्रासदायक होत चालल्या आहेत. या गोष्टी अॅडवेअर, स्पायवेअर आणि मॅलवेअर या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टी सध्या तर इतक्या त्रासदायक ठरत चालल्या आहेत. डोक्याला त्रास बनलेल्या तीन गोष्टीच्या मानाने व्हायरस परवडला, असं आता वाटू लागलं आहे.




ऍडवेअर (जाहिरात करणारे प्रोग्राम)

जबरदस्तीने आपल्या वस्तूंची जाहिरात व्हावी, या हेतूने बऱ्याच कंपन्या एखादा चांगला प्रोग्राम बनवतात आणि तो प्रसिद्ध व्हावा यासाठी तो मोफत देतात. साहजिकच या मोफत प्रोग्राममध्ये त्या कंपनीच्या एखाद्या वस्तूची जाहिरात जाणूनबुजून लपवलेली असते, जी तो मोफत प्रोग्राम कम्प्युटर लोड केल्यानंतर आपोआप आपल्या कम्प्युटरमध्ये लोड होते. नंतर वारंवार त्या वस्तूची जाहिरात आपण कम्प्युटरवर काम करताना समोर येते.

सुरुवातीला या जाहिरातीकडे दुर्लक्ष केलं तरी नंतर-नंतर ती अचानक आणि सतत कम्प्युटरवर काम करताना समोर आल्याने त्रासदायक वाटू लागते. अशा जाहिराती लपवलेल्या अवस्थेमध्ये कम्प्युटरमध्ये लोड झाल्याने त्या कम्प्युटरमधून काढताही येत नाहीत. कारण कम्प्युटरमध्ये लोड केलेल्या सॉफ्टवेअरच्या यादीमध्ये अशा जाहिरातीची कुठेच नांेद आढळत नाही. अशावेळेस त्या कम्प्युटरला फॉरमॅट करणं हाच पर्याय बरेच लोक वापरतात.


स्पायवेअर (हेरगिरी करणारे प्रोग्राम)

सध्या आवश्यक असलेल्या बऱ्याच गोष्टी कम्प्युटरवरून ऑॅनलाइन करता येतात. इंटरनेटचा वापर फक्त ई-मेल पाठवण्यासाठी आणि वेबसाइट पाहण्यासाठीच मर्यादित राहिला नसून सध्या रेल्वे किंवा विमानाचं तिकीट बुकिंग करणं, ऑॅनलाइन बँकिंग म्हणजेच ऑॅनलाइन बँक खात्याने बँकेचे सर्व व्यवहार करणं, खरेदी-विक्री करणं, वीज/मोबाइलचं बिल भरणं आदी बऱ्याच गोष्टी सध्या कम्प्युटरने ऑॅनलाइन करता येतात. या सर्व व्यवहाराच्या गोष्टीसाठी पैसे क्रेडिट कार्ड अथवा ऑॅनलाइन बँकिंग खात्याने पैसे पाठवून व्यवहार केला जातो. मग अशा क्रेडिट कार्ड अथवा ऑॅनलाइन बँकिंग खात्याद्वारे केलेल्या व्यवहाराची माहिती कम्प्युटरमध्ये साठवलेली असते ज्या माहितीचा चोरून गैरवापर होऊ शकतो आणि हीच माहिती आपल्या कम्प्युटरमधून चोरण्याचं काम 'स्पायवेअर' करतात. ही चोरलेली माहिती मग ते 'स्पायवेअर' प्रोग्राम्स आपल्या निर्मात्याला पाठवतात. दुसऱ्याच्या कम्प्युटरवर हेरगिरी करण्याचं काम स्पायवेअर प्रोग्राम्स करतात.


मॅलवेअर (कामाचं नुकसान करणारा प्रोग्राम)

हे प्रोग्राम व्हायरसप्रमाणेच कम्प्युटरला नुकसान करण्यासाठी बनवलेले असतात. इतरांचा कम्प्युटर बिघडावा, त्यांचं काम होऊ नये या हेतूने बनवलेले असतात. हे प्रोग्राम आपणहून कम्प्युटरमध्ये आपोआप शिरकाव करतात आणि हे एका ठिकाणाहून दुसरीकडे पसरतात.

हे प्रोग्राम कम्प्युटरमध्ये व्हायरस, ट्रोजन आणि वर्म यासारखे कम्प्युटर बिघडवणारे प्रोग्राम कम्प्युटरमध्ये आपोआप लोड करून तो कम्प्युटर बिघडवण्याचे काम करतात.

हे प्रोग्राम्स बऱ्याच वेळेस छुप्या स्थितीमध्ये राहून आपल्या नकळत कम्प्युटरचं नुकसान करत असतात. हे प्रोग्राम्स प्रत्यक्षपणे कम्प्युटरमधील काम आणि सॉफ्टवेअर्सचं नुकसान करत नसल्याने ते आपल्या कम्प्युटरमध्ये लोड केलेल्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअरच्या निदर्शनास येत नाहीत तर काहीवेळेस आपल्या कम्प्युटरमधील अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ते आपल्या कम्प्युटरमध्ये आहेत, याची सूचना आपल्याला देतात पण त्यांना नष्ट करू शकत नाहीत त्यामुळे सध्या अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर सोबत कम्प्युटरमध्ये हेरगिरी करणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या प्रोग्रामला काढण्यासाठीही तशाप्रकारचा प्रोग्राम कम्प्युटरमध्ये लोड करणं आवश्यक आहे.


सुपर अँटी स्पायवेअर हा मोफत मिळणारा प्रोग्राम जास्त प्रसिद्ध आहे. तो www.superantispyware.com या वेबसाइटवरून मोफत डाऊनलोड करू शकता.


महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वेबसाइटवरून हा मोफत सॉफ्टवेअर डाऊनलोड करून आपल्या कम्प्युटरमध्ये लोड केल्यानंतर आपल्या कम्प्युटरच्या डाव्या कोपऱ्यातील सिस्टम ट्रेमध्ये एक छोट्या किटकाचं चित्र दिसू लागेल, त्यावर डबलक्लिक करून सुरुवातीला संपूर्ण कॉम्प्युटर स्कॅन करुन घ्यावा.

0 टिप्पणी(ण्या):